Elderly laborer struck : तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे बकरीसाठी पाला आणण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर मार लागला असून, त्याच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पांडुरंग धारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिनगाव जहागिर येथे जीवघेणा हल्ला; 60 वर्षीय जखमीवर जालन्यात उपचार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे बकरीसाठी पाला आणण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर मार लागला असून, त्याच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पांडुरंग धारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कचरुबा रामराव सरोदे (वय 60, व्यवसाय मजुरी, रा. सिनगाव जहागिर, ता. देऊळगाव राजा) हे दि. 2 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास गावालगतच्या शिवारात बकरीसाठी पाला आणण्यासाठी गेले होते. ते जितमल पठाडे यांच्या शेताजवळ असताना आरोपी पांडुरंग धारे, रा. सिनगाव जहागिर हा हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आला. तक्रारीनुसार, आरोपीने कोणतेही कारण न सांगता कचरुबा सरोदे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला, कपाळावर तसेच पाठीवर वार करून त्यांना जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी कचरुबा सरोदे यांच्यावर पुढील उपचारासाठी परिणीका हॉस्पिटल, जालना येथे दाखल करण्यात आले. तेथे नोंदविण्यात आलेल्या जबाबावर आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक 305/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार गजानन काकड यांनी केली असून, पुढील तपास बिट पोलीस हवालदार माधव कुटे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे सिनगाव जहागिर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वृद्ध मजुरावर झालेल्या हल्ल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

