Molestation of a minor girl : चान्नी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी, तसेच तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आलेगाव येथील आरोपी मुकुंदा दत्ता काळदाते याच्याविरुद्ध १ जुलै रोजी चान्नी पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

चान्नी हद्दीत संतापजनक प्रकार; अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कुटुंबीयांना मारहाण
चान्नी : चान्नी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याशी छेडछाड केल्याप्रकरणी, तसेच तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आलेगाव येथील आरोपी मुकुंदा दत्ता काळदाते याच्याविरुद्ध १ जुलै रोजी चान्नी पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकुंदा काळदाते हा पीडित मुलीच्या घरासमोर येऊन मोठ्याने आरडाओरडा करत होता. यावेळी त्याने, “तुला दिलेला मोबाईल कुठे आहे?” अशी विचारणा करत अल्पवयीन मुलीचा वाईट उद्देशाने हात पकडून तिच्याशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, मुलीची सुटका करण्यासाठी पीडितेच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप केला असता आरोपीने त्यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, “माझ्या नावाने पोलिसांत तक्रार दिली तर जीवे मारून टाकीन,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, २९ जून रोजी आरोपीने फिर्यादीच्या भावालाही दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेकडून देण्यात आलेल्या जबानी रिपोर्टवरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

