Blood donation camp : डॉक्टर्स डे तसेच कृषी दिनाचे औचित्य साधून देऊळगाव राजा येथील डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

‘जीवनदानाचा’ उपक्रम : देऊळगाव राजा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर यशस्वी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : डॉक्टर्स डे तसेच कृषी दिनाचे औचित्य साधून देऊळगाव राजा येथील डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रुग्णांसाठी देवदूत मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा डॉक्टर्स डे आणि शेतकऱ्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा कृषी दिन या दुहेरी औचित्याने हा उपक्रम राबविण्यात आला. देऊळगाव राजा येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रक्तदान शिबिरात शहरातील अनेक नागरिक, युवक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्तपेढ्यांवरील ताण कमी व्हावा आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. विशाल शिंदे, सचिव डॉ. उमेश मुंडे, कोषाध्यक्ष डॉ. बालाजी तायडे, तसेच डॉ. दत्ता मांटे, डॉ. प्रवीण तिडके, डॉ. वैभव वायाळ, डॉ. विठ्ठल देशमुख, डॉ. सुनील कुटे, डॉ. नितीन बनकर, डॉ. गोरख आढाव, डॉ. गौरव कोल्हे, डॉ. अक्षय मांटे, डॉ. भगवान खरात, डॉ. अशोक काबरा आणि डॉ. संतोष पापडे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टरांनी आपली उपस्थिती दर्शवून उपक्रमाला बळ दिले.
समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे देऊळगाव राजा परिसरात सकारात्मक संदेश गेला असून, डॉक्टरांनी केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता सामाजिक उत्तरदायित्वही जपले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमातून डॉक्टरांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

