Three-day health training : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक, प्रभावी व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, चांडोळ येथे आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले.

‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला गती; चांडोळ PHC मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वसमावेशक प्रशिक्षण
धाड : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक, प्रभावी व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, चांडोळ येथे आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिरास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. दुर्धर आजार, साथरोग तसेच आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितींमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी अधिक तत्पर, सक्षम आणि प्रभावीपणे सेवा कशी द्यावी, याबाबत या प्रशिक्षणातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण नागरिकांपर्यंत अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तसेच आशा स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणात प्रसूतीपूर्व नोंदणी सेवा, प्रसूतीपश्चात आरोग्य सेवा, नवजात बालकांचे आरोग्य, किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, मानसिक आरोग्य, आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांसह एकूण 13 प्रकारच्या आरोग्य सेवांबाबत सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण स्तरावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कौशल्यवृद्धी करून नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरविणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज चिंचोले, डॉ. प्रशांत बुधवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्यासह डॉ. निलेश जाधव, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. शिवानंद शिंगाडे, स्वाती शेंद्रे, सुवर्णा बेलसरे, सुनिता जवंजाळ, कविता खाडे, सुलोचना परहाड आणि सुनिल लोखंडे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. नितीन कदम यांनी आभार प्रदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, चांडोळ येथील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि प्राथमिक स्तरावर आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

