RTO : प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मालक व चालकांसाठी मराठी भाषेचा प्रभावी वापर आणि ग्राहकांशी सुसंस्कृत संवाद या विषयावर प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

‘मराठीत बोला, नम्रतेने वागा’ : ऑटोचालकांसाठी आरटीओचे विशेष प्रशिक्षण
आगाखान पठाण
अकोला : प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मालक व चालकांसाठी मराठी भाषेचा प्रभावी वापर आणि ग्राहकांशी सुसंस्कृत संवाद या विषयावर प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात ऑटोचालकांनी प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा प्रभावी, शुद्ध आणि सुसंस्कृत वापर करावा, तसेच ग्राहकांशी नम्र व सौजन्यपूर्ण वर्तन ठेवून दर्जेदार सेवा द्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक नागरिकांना सहज व सोयीस्कर संवाद साधता यावा आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व आनंददायी व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोटार वाहन निरीक्षक अनिरुद्ध देवधर व संदीप तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ऑटोचालकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यापुढेही प्रवासी सेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थेत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने देण्यात आली.

