Mahabreaking

[breaking_news]

Shiv Sena : वारकऱ्यांच्या भावना जपण्यासाठी शिवसेनेचे निवेदन; मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याची मागणी

Shiv Sena :  संत मुक्ताबाई यांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त अंढेरा, देऊळगाव मही व देऊळगाव राजा येथील पालखी मार्गावरील मटन, चिकन व मासे विक्रीची दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच सोहळ्यादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Shiv Sena
पालखी सोहळ्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडे निवेदन;पोलिस बंदोबस्त वाढवा

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : संत मुक्ताबाई यांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त अंढेरा, देऊळगाव मही व देऊळगाव राजा येथील पालखी मार्गावरील मटन, चिकन व मासे विक्रीची दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच सोहळ्यादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील महान संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन २ जुलै रोजी अंढेरा व देऊळगाव मही, तर ३ जुलै रोजी देऊळगाव राजा येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी हजारो वारकरी, भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.
अंढेरा, देऊळगाव मही आणि देऊळगाव राजा येथील पालखी मार्गावर मटन, चिकन व मासे विक्रीची अनेक दुकाने असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा विचार करता पालखी मार्गावर मांसविक्री सुरू राहिल्यास वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे, स्वच्छता राखणे आणि शांततापूर्ण वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २ व ३ जुलै २०२६ रोजी पालखी मार्गावरील सर्व मटन, चिकन व मासे विक्रीची दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याबाबत संबंधित दुकानदारांना सूचना देण्याची, तसेच या कालावधीत पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याची विनंती केली आहे.
वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
हे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, तालुकाप्रमुख सुदाम काकड, युवा सेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, विधानसभा संपर्कप्रमुख दीपक पवार, शहरप्रमुख अतिश खरात, सोशल मीडिया विभागीय प्रमुख सचिन व्यास, उपशहरप्रमुख राजेश सपाटे, शहर संघटक बंटी सुनगत, विभागप्रमुख गोपाळ खेडेकर, उपशहरप्रमुख गोपाळ वायाळ, सरपंच बद्री दंदाले आणि विभागप्रमुख संदीप तळेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top