Four-year battle: बाळापूर येथील वाल्मिक नगरमध्ये राहणारे मोहन चावरीया यांची कन्या कु. भक्ती मोहन चावरीया ही गेल्या चार वर्षांपासून थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी धैर्याने झुंज देत आहे. या काळात तिचे जीवन केवळ नियमित रक्तदानाच्या आधारावर सुरू आहे. दर महिन्याला रक्त चढवावे लागत असल्याने तिच्यावर आणि कुटुंबावर मोठे शारीरिक, मानसिक व आर्थिक संकट कोसळले आहे.

३० लाखांच्या बोन मॅरो शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज; एका लेकराच्या आयुष्यासाठी पुढे या!
जाकीर अहमद
बाळापूर : बाळापूर येथील वाल्मिक नगरमध्ये राहणारे मोहन चावरीया यांची कन्या कु. भक्ती मोहन चावरीया ही गेल्या चार वर्षांपासून थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी धैर्याने झुंज देत आहे. या काळात तिचे जीवन केवळ नियमित रक्तदानाच्या आधारावर सुरू आहे. दर महिन्याला रक्त चढवावे लागत असल्याने तिच्यावर आणि कुटुंबावर मोठे शारीरिक, मानसिक व आर्थिक संकट कोसळले आहे.
आता डॉक्टरांनी भक्तीच्या उपचारासाठी बेंगळुरू येथे बोन मॅरो प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant) करण्याचा सल्ला दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
भक्तीचे वडील श्री. मोहन चावरीया यांनी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. घरातील साठवलेली पुंजी, जमेल तेवढी आर्थिक व्यवस्था आणि नातेवाईकांची मदत यावर आतापर्यंत उपचार सुरू ठेवले. मात्र आता एवढा मोठा खर्च उचलणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
एका निष्पाप चिमुकलीचे आयुष्य वाचविण्याची ही वेळ आहे. मोठ्या संकटाशी एकट्याने लढणे कोणालाही शक्य नसते; मात्र समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटीशी आर्थिक मदतही एका लेकराला नवजीवन देऊ शकते.
“सेवाधर्म हाच खरा पुण्यधर्म” या भावनेतून सर्व सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, मित्रपरिवार आणि नागरिकांनी कु. भक्तीच्या उपचारासाठी शक्य ती आर्थिक मदत करावी, असे भावनिक आवाहन तिच्या कुटुंबीयांनी केले आहे.
आपण दिलेला प्रत्येक रुपया हा केवळ आर्थिक हातभार नसून एका चिमुकलीच्या आयुष्याला मिळणारी नवी संधी ठरू शकतो.

