Mahabreaking

[breaking_news]

Teacher recruitment :आश्रमशाळांतील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलवर; मनमानीला बसणार लगाम

Teacher recruitment : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया आता ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच बेरोजगार पात्र शिक्षकांना गुणवत्तेच्या आधारे समान संधी उपलब्ध होणार आहे.

pavitra portal

वशिलेबाजीला आळा, गुणवत्तेला प्राधान्य; आश्रमशाळा शिक्षक भरती पूर्णपणे ऑनलाइन

बुलढाणा : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया आता ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच बेरोजगार पात्र शिक्षकांना गुणवत्तेच्या आधारे समान संधी उपलब्ध होणार आहे.

add

यापूर्वी खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत मनमानी, वशिलेबाजी आणि आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने भरती प्रक्रिया पूर्णपणे केंद्रीकृत आणि ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टीईटी व टीएआयटीसह आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त करून अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवारांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. गुणवत्तेनुसार निवड होणार असल्याने ग्रामीण भागातील पात्र उमेदवारांनाही समान संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

add

शासनाने मंजूर केलेल्या संच मान्यतेनुसार आणि विद्यार्थी संख्येच्या आधारे रिक्त पदांची माहिती ‘पवित्र’ पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. त्यानुसारच शिक्षक भरती प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याने अतिरिक्त किंवा अनियमित नियुक्त्यांना आळा बसणार आहे.

नवीन शासन निर्णयानुसार, ‘पवित्र’ पोर्टलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास संबंधित शाळांचे शासकीय अनुदान रोखण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

add

भरती प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती देणे किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्तेला प्राधान्य आणि समान संधी या तत्त्वांना बळकटी देणारा हा निर्णय असल्याचे शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत असून, यामुळे आश्रमशाळांमधील शिक्षक भरती अधिक विश्वासार्ह आणि नियमसंगत होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top