Mehunarajas brave son :संत चोखामेळा महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहुणाराजा गावचा सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील शहीद हवालदार अंकुश महादेव मिसाळ यांनी २६ जून २०२६ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करताना मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या वीरमरणाने संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

देशासाठी सर्वोच्च बलिदान; शहीद अंकुश मिसाळ यांना अश्रुपूर्ण निरोप, मुलगा रणवीर व मुलगी दिव्याने दिला मुखाग्नी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : संत चोखामेळा महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहुणाराजा गावचा सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील शहीद हवालदार अंकुश महादेव मिसाळ यांनी २६ जून २०२६ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करताना मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या वीरमरणाने संपूर्ण देऊळगाव राजा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. त्यानंतर लष्करी ताफ्यासह पार्थिव देऊळगाव राजा शहरात दाखल होताच बसस्थानक चौकात शेकडो नागरिकांनी अश्रुपूर्ण वातावरणात आपल्या वीरपुत्राचे अखेरचे दर्शन घेतले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “शहीद अंकुश मिसाळ अमर रहे” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी पार्थिवासोबत शोकसंचलन काढले. मोटारसायकल रॅलीद्वारे नागरिकांनी पार्थिवाला मानवंदना दिली. शहरातील विविध ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती.
दुपारनंतर मेहुणाराजा येथे जिल्हा परिषद शाळेजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाणा पोलीस दल व भारतीय सैन्य दलाने शहीद जवानाला शस्त्र सलामी देत अखेरचा निरोप दिला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शहीद अंकुश मिसाळ यांचा मुलगा रणवीर आणि मुलगी दिव्या यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. हा हृदय हेलावून टाकणारा क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
गेल्या दोन दिवसांपासून मेहुणाराजा गावात कुठल्याही घरात चूल पेटली नव्हती. योगायोगाने वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशीही गावातील अनेक सुवासिनींनी वडाची पूजा न करता आपल्या वीरपुत्राच्या स्मृतीला प्राधान्य दिले. संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
अंत्यसंस्कारावेळी नाईक सुभेदार निरज कुमार (हेडक्वार्टर भुसावळ) यांनी शहीद जवानाला लष्करी मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हा सैनिक अधिकारी रंजन सरकटे, सैनिक कल्याण कार्यालयाचे अर्जुन गाडेकर, हवालदार विलास दाभाडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, सैनिक जिल्हाध्यक्ष शिवानंद उबाळे, माजी सैनिक जिल्हा उपाध्यक्ष भगवान चाटे, जिल्हा उपाध्यक्ष उबाळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदाताई कायंदे, सतीश कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपा नेते गणेश मांटे, शिवसेना तालुकाध्यक्ष दादाराव खार्डे, धनश्री राम शिपणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष दराडे, प्रकाश गीते, वंचित बहुजन आघाडीच्या सविताताई मुंडे, सुनील कायंदे, भगवान मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनसिंग शिंगणे, सरपंच विष्णू बोंद्रे, मंदाताई बोंद्रे, ग्रामसेवक नागरे, तलाठी बराडे, महसूल सेवक शरद काकडे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदाला श्रद्धांजली अर्पण केली.
जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ महिला-पुरुष, पंचक्रोशीतील नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू-भगिनी तसेच हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
आई, पत्नी, मुलगा रणवीर, मुलगी दिव्या आणि संपूर्ण मिसाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांच्या वीरपुत्राने राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. शहीद अंकुश महादेव मिसाळ यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहतील.

