Deplorable condition : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील शेतरस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि पाण्याचे साचलेले डबके असल्यामुळे बैल, ट्रॅक्टर तसेच पेरणीसाठी लागणारे साहित्य शेतापर्यंत नेणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बैल, ट्रॅक्टर आणि पेरणी साहित्य नेणे कठीण; रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील शेतरस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि पाण्याचे साचलेले डबके असल्यामुळे बैल, ट्रॅक्टर तसेच पेरणीसाठी लागणारे साहित्य शेतापर्यंत नेणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून ‘मुख्यमंत्री पांदण रस्ता’ योजनेची अंमलबजावणी होत असल्याचा दावा केला जात असला, तरी दिग्रस खुर्द येथील शेतरस्त्याची अवस्था मात्र वर्षानुवर्षे जैसे थे आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने तो अक्षरशः तलावाचे स्वरूप धारण करीत असून शेतात ये-जा करणे धोकादायक बनले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, संबंधित शेतरस्त्याचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मुरूम टाकून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत संजय महाले, किसन सोळंके, राजेश महादेव महाले, रामदास चिकटे, मंगलाबाई इंगळे, जनार्दन इंगळे, विजू महाले, लक्ष्मण फाळके, निलेश गवई यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मंगलाताई इंगळे, माजी तालुका अध्यक्षा, वंचित बहुजन महिला आघाडी (पातूर) यांनी सांगितले की, “या पांदण रस्त्याचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम सुरू करावे. अन्यथा सर्व शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील.”
दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

