74 hectares of agricultural land returned : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील ६९ प्रकरणातील अवैध सावकारांकडील ७४.२७ हेक्टर आर शेतजमिन शेतकऱ्यांना परत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॅा. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

६५१ प्रकरणांची चौकशी पूर्ण
बुलढाणा : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील ६९ प्रकरणातील अवैध सावकारांकडील ७४.२७ हेक्टर आर शेतजमिन शेतकऱ्यांना परत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॅा. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांकडून होत असलेली पिळवणूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असून शेतकऱ्यांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताचे खंडन करीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले की, अवैध सावकारी तक्रारींची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही नियमितपणे करण्यात येते. शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षक सदस्य असून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे सदस्य सचिव आहेत.
हा अधिनियम अंमलात आल्यापासून आतापर्यंत कलम १६ अंतर्गत ७७८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६५१ प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच कलम १८(२) अंतर्गत ४०१ तक्रारी प्राप्त झालेल्या असून २७० तक्रारी निकाली काढल्या गेल्या आहेत, तर १३१ प्रकरणे प्रलंबित आहेत. या अधिनियमांतर्गत आतापर्यंत ६९ प्रकरणांत ७४.२७ हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली असून ५५ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध सावकारांकडून पिळवणूक झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

