Health Department leadership : बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) पदाची जबाबदारी सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सुपुत्र डॉ. रणजीत मंडाले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांची बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आरोग्य विभागात या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.

बुलढाणा आरोग्य यंत्रणेला नवे नेतृत्व; डॉ. रणजीत मंडाले यांच्यावर डीएचओची जबाबदारी
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) पदाची जबाबदारी सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सुपुत्र डॉ. रणजीत मंडाले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांची बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आरोग्य विभागात या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.
आरोग्य क्षेत्रातील विविध पदांवर कार्यरत असताना डॉ. मंडाले यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रशासनिक अनुभव, कार्यक्षम नेतृत्व आणि सेवाभावी दृष्टिकोनामुळे आरोग्य विभागात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देवळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर मलकापूर-पांगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच मेहकर येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने त्यांची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या विविध आरोग्य योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे डॉ. मंडाले यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, गतिमान आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभ करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
डॉ. रणजीत मंडाले यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला स्थानिक पातळीवर कामाचा अनुभव असलेले नेतृत्व लाभल्याने आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत अधिक गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

