Mysterious incident : पातूर तालुक्यातील तुलंगा बु. येथे एका महिला पशुपालकाच्या गोठ्यातील १० बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २४ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संबंधित महिला शेतकरी आर्थिक संकटात सापडली असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पावसानंतर गोठ्यातील १० बकऱ्या मृतावस्थेत; लाखोंचे नुकसान झाल्याचा दावा
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर तालुक्यातील तुलंगा बु. येथे एका महिला पशुपालकाच्या गोठ्यातील १० बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २४ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संबंधित महिला शेतकरी आर्थिक संकटात सापडली असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुलंगा बु. येथील चंद्रकला उत्तमराव रामचवरे या मजूर महिला असून त्यांनी पशुपालन व्यवसायातून उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे. मंगळवारी (दि. २३ जून) सायंकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारून आणल्यानंतर त्यांनी त्या गोठ्यात बांधल्या होत्या. मात्र बुधवारी सकाळी गोठ्याकडे गेल्यानंतर त्यांना १० बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी डी. के. देशमुख व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यावेळी रविंद्र भोंगरे, अरुण हातोले व माला भोंगरे यांची उपस्थिती होती. दरम्यान, अकोला येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज घावट यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बकऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. बकऱ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शासनाने आर्थिक मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रकला उत्तमराव रामचवरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

