special revision of voter lists :भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यभर सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला असून बुलढाणा जिल्ह्यात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.

‘त्रुटीमुक्त मतदार यादी’साठी प्रशासनाचा पुढाकार ; बीएलओंसह निवडणूक कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन
बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यभर सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला असून बुलढाणा जिल्ह्यात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाने २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत तयारी, प्रशिक्षण आणि Enumeration Form छपाईची प्रक्रिया निश्चित केली आहे. या मोहिमेद्वारे नव्याने पात्र ठरणाऱ्या मतदारांचा समावेश, स्थलांतरित व मयत मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे तसेच प्रत्येक मतदाराची माहिती पडताळून पाहण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पी. एम. साने (NLMT) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी या प्रशिक्षणात ऑनलाइन सहभागी झाले होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी अजिंक्य घोडके, उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपविभागीय अधिकारी जयश्री ठाकरे, तहसीलदार वृशाली केसकर, तहसीलदार संजीवनी मुपडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान नव्या मतदारांची नोंदणी, स्थलांतरित व मयत मतदारांच्या नोंदींची अचूक पडताळणी, अर्ज भरण्याची प्रक्रिया तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदार यादीत समावेश व्हावा आणि यादी अद्ययावत राहावी, यासाठी काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना पी. एम. साने यांनी दिल्या.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची अचूकता अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेमुळे मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

