Demanded the return :उसने दिलेल्या पैशांची परतफेड मागण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बु. येथे घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी महिलेसह पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कर्जाच्या पैशांवरून गिरोली बु. येथे तुफान राडा; महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : उसने दिलेल्या पैशांची परतफेड मागण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर दगडाने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बु. येथे घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी महिलेसह पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल साहेबराव चव्हाण (वय ३४, रा. गिरोली बु., ह.मु. साईनगर, ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून राहुल अशोक कुसळकर, संतोष रामदास पिटकर, गणेश रामदास पिटकर, राहुल शिवाजी शिंदे आणि आरती राहुल कुसळकर (सर्व रा. गिरोली बु.) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, अनिल चव्हाण यांनी आरोपी राहुल कुसळकर याच्या मुलाच्या उपचारासाठी यापूर्वी ४० हजार रुपये उसने दिले होते. या पैशांची परतफेड मागण्यासाठी ते १८ जून रोजी दुपारी आरोपीच्या घरी गेले होते. यावेळी राहुल कुसळकर याने “कशाचे पैसे, कोणते पैसे? मी तुला पैसे देत नाही, तुला काय करायचे ते करून घे,” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर आरोपीने जवळच पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात अनिल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव सुरू झाला. दरम्यान, भांडण सुरू असताना संतोष पिटकर, गणेश पिटकर आणि राहुल शिंदे हे घटनास्थळी आले. त्यांनीही फिर्यादीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नी पूजा चव्हाण आणि वहिनी शितल मुधोळकर मध्यस्थी करण्यासाठी आल्या. मात्र, त्यावेळी आरती राहुल कुसळकर हिनेही त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.
ग्रामीण भागात आर्थिक व्यवहारातून निर्माण होणारे वाद अनेकदा हिंसक स्वरूप धारण करत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये लेखी पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

