MLA Manoj Kayande : मतदारसंघातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते अंभोरा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या उपकेंद्रामुळे देऊळगाव राजा शहरातील औद्योगिक परिसर, ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना अधिक सक्षम, दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय; आमदार कायंदे यांनी दिला साडेतीन हजार ग्राहकांना दिलासा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : मतदारसंघातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते अंभोरा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या उपकेंद्रामुळे देऊळगाव राजा शहरातील औद्योगिक परिसर, ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना अधिक सक्षम, दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अंभोरा उपकेंद्रावर वाढलेल्या ताणामुळे कमी दाबाने वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि शेतीपंपांना अपुरा पुरवठा यांसारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः औद्योगिक परिसराचा विस्तार आणि वाढती ग्राहकसंख्या यामुळे विद्यमान यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार मनोज कायंदे यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन उपकेंद्राचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार कायंदे म्हणाले, “ग्रामीण भागातील शेतकरी, उद्योग आणि सर्वसामान्य ग्राहकांना सक्षम, दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. नवीन उपकेंद्रामुळे वीज वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल आणि परिसराच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती मिळेल.”

शेतकरी आणि उद्योगांना मोठा लाभ
अतिवृष्टी, अल्पवृष्टी आणि हवामानातील बदलांमुळे शेती क्षेत्र अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी विहिरी व इतर जलस्रोतांवर आधारित सिंचन व्यवस्था महत्त्वाची ठरते. मात्र कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन उपकेंद्रामुळे शेतीपंपांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार असून कृषी क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे.
तसेच देऊळगाव राजा शहरातील औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला अखंडित वीजपुरवठा मिळाल्याने उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या गावांना होणार थेट फायदा
नवीन उपकेंद्रामुळे देऊळगाव राजा शहरातील औद्योगिक परिसरासह अंभोरा, जांभोरा, जवळखेड, उंबरखेड, पळसखेड झाल्टा, पळसखेड मलकदेव आणि परिसरातील गावांतील ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे. सुमारे २,६०० घरगुती ग्राहक तसेच शेतीपंप, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक मिळून साडेतीन हजारांहून अधिक वीज ग्राहकांना या उपकेंद्राचा फायदा होणार आहे.

राजकीय इच्छाशक्तीमुळे प्रकल्प साकार
स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने आमदार मनोज कायंदे यांच्या विकासाभिमुख भूमिकेची चर्चा होत आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
उंबरखेड रोड, अंभोरा येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्यास माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, ज्येष्ठ नेते सिद्दिक शेठ, धनश्रीराम शिपने, श्याम मेहत्रे, दिलीप झोटे, राजीव भूतडा, गजानन काकड, प्रदीप वाघ, महावितरणचे उपविभागीय अभियंता संदीप शेटे, शहर अभियंता मुरलीधर नागरे, विष्णू झोरे, राजेंद्र खांडेभराड, विकास कासारे, नितीन कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदाशिव मुंडे, शहराध्यक्ष सुनील शेजुळकर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
नवीन उपकेंद्रामुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच मतदारसंघाच्या विकासाला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

