Man swindles: केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) अधिकारी असल्याची बतावणी करून एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना बाळापूर बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

CBI अधिकाऱ्याची बतावणी करून ज्येष्ठ व्यापाऱ्याला लुटले; दोन भामट्यांचा कारनामा
बाळापूर : केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) अधिकारी असल्याची बतावणी करून एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना बाळापूर बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर रेलूमन नथ्थानी (वय ७१, रा. झुलेलाल नगर, जुना पॉवर हाऊस परिसर, खामगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून बाळापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(१), २०४ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नथ्थानी हे खामगावहून बसने अकोल्याकडे जात होते. प्रवासादरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या मागोमाग बसमध्ये चढला आणि कंडक्टरजवळ उभा राहिला. त्याने स्वतःला CBI अधिकारी असल्याचे सांगत एक ओळखपत्र दाखविले. त्यानंतर नथ्थानी यांच्या बॅगेत मोठी रक्कम असल्याची माहिती असल्याचे सांगून त्यांना बाळापूर बसस्थानकावर उतरून पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या नथ्थानी यांनी संबंधित व्यक्तीला हे पैसे एका व्यापाऱ्याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने त्यांना बसमधून खाली उतरविले. काही वेळातच तेथे एक स्कुटी आली. त्यावर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधित इसम बोलू लागला आणि नथ्थानी यांना “पोलीस वाहन येत आहे, ते तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल,” असे सांगितले.
दरम्यान, आरोपींनी चतुराईने नथ्थानी यांच्याजवळील रोख ९ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग आणि सुमारे १० हजार रुपये किंमतीचा जुना अँड्रॉइड मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर दोन्ही आरोपी स्कुटीवरून पसार झाले. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नथ्थानी यांनी पोलिसांत धाव घेतली.

या घटनेमुळे बाळापूर परिसरात खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या बनावट अधिकारी बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे करीत आहेत.
कोणतीही व्यक्ती स्वतःला CBI, पोलीस किंवा अन्य तपास यंत्रणेचा अधिकारी असल्याचे सांगत असल्यास त्याची अधिकृत ओळख खात्रीशीरपणे तपासावी. संशयास्पद परिस्थितीत तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

