Members of Lohara Gram Panchayat : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेला १२ पैकी तब्बल १० सदस्यांनी दांडी मारल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली. सदस्यांच्या या सामूहिक अनुपस्थितीमागे प्रशासनाच्या कारभाराविरोधातील नाराजी असल्याची चर्चा गावात रंगली आहे.

भ्रष्टाचार, पाणीटंचाई अन् रखडलेली विकासकामे; लोहारा ग्रामपंचायतीची सभा तहकूब
बाळापूर : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोहारा ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेला १२ पैकी तब्बल १० सदस्यांनी दांडी मारल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली. सदस्यांच्या या सामूहिक अनुपस्थितीमागे प्रशासनाच्या कारभाराविरोधातील नाराजी असल्याची चर्चा गावात रंगली आहे.

मार्च महिन्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामपंचायतीवर प्रशासकीय व्यवस्था लागू करण्यात आली होती. त्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील सुमारे ३४ लाख ६८ हजार रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रवीण मोरे आणि ग्रामपंचायत सचिव बाळापुरे यांच्याविरोधात उरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने ग्रामपंचायत चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांचेही जबाब नोंदविण्यात आले होते. त्यामुळे तीन महिन्यांनंतर बोलावण्यात आलेल्या सभेबाबत काही सदस्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. संभाव्य चौकशी किंवा प्रशासकीय कारवाईच्या भीतीने काही सदस्यांनी सभेला गैरहजर राहणे पसंत केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून स्वच्छतेच्या कामांनाही खीळ बसली आहे. नाल्यांची सफाई रखडल्याने अनेक भागांत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न मिळाल्याने अनेक विकासकामे ठप्प पडली आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या खात्यात निधी उपलब्ध असतानाही कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शुक्रवारी झालेल्या सभेत केवळ एक सदस्य उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी सभा तहकूब करण्यात आली. लोहारा ग्रामपंचायतीच्या इतिहासात सदस्यांच्या अपुऱ्या उपस्थितीमुळे मासिक सभा तहकूब होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

सदस्यांचा प्रशासनावर निशाणा
ग्रामपंचायत सदस्य फरीदा बी. शेख युनूस यांनी ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे ढासळल्याचा आरोप केला. गावात विकासकामे होत नसून पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. काही सदस्यांनी सभेला गैरहजर राहून आपल्या नाराजीचा निषेध नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. भराळे यांनी खाते बदल व इतर प्रशासकीय विषयांसाठी सभा बोलावण्यात आल्याचे सांगितले. मात्र प्रशासक आणि एकच सदस्य उपस्थित असल्याने सभा तहकूब करण्यात आली असून शनिवारी पुन्हा सभा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीतील या घडामोडींमुळे लोहारा गावातील राजकीय आणि प्रशासकीय संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढील सभेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

