MAHATET 2026 :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ चे आयोजन २८ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. अकोला शहरात या परीक्षेसाठी एकूण २५ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून प्रशासनाने परीक्षेच्या यशस्वी व पारदर्शक आयोजनासाठी व्यापक तयारी केली आहे.

AI-CCTV, फेस स्कॅनिंग आणि बायोमेट्रिकच्या निगराणीत शिक्षक पात्रता परीक्षा
अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ चे आयोजन २८ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. अकोला शहरात या परीक्षेसाठी एकूण २५ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून प्रशासनाने परीक्षेच्या यशस्वी व पारदर्शक आयोजनासाठी व्यापक तयारी केली आहे.

परीक्षेचा पेपर क्रमांक १ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत, तर पेपर क्रमांक २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत होणार आहे. पेपर क्रमांक १ साठी १९ परीक्षा केंद्रांवर ५,५५६ उमेदवार परीक्षा देणार असून, पेपर क्रमांक २ साठी २५ केंद्रांवर ७,०४० उमेदवार प्रविष्ट झाले आहेत. अशाप्रकारे एकूण १२,५९६ उमेदवार परीक्षा देणार आहेत.
यामध्ये ३१३ दिव्यांग उमेदवारांचा समावेश असून त्यांना नियमानुसार अतिरिक्त वेळ व आवश्यकतेनुसार लेखनिकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षार्थींनी प्रवेशपत्रासोबत वैध फोटो ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष आहेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात जिल्हा सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
परीक्षेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी बी.आर. हायस्कूल, अकोला येथे जिल्हा संकलन कक्ष स्थापन करण्यात आला असून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची जिल्हा परिरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.

हायटेक सुरक्षाव्यवस्था
परीक्षा केंद्रांवर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी, फेस स्कॅनिंग, मेटल डिटेक्टर तपासणी आणि AI आधारित लाईव्ह CCTV यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गखोलीवर कॅमेऱ्यांची नजर राहणार असून “फोटो व्ह्यू” प्रणालीद्वारे उमेदवारांची ओळख पडताळली जाणार आहे.
तसेच “कनेक्ट व्ह्यू” तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा केंद्र संचालक, जिल्हा नियंत्रण कक्ष आणि परीक्षा परिषद, पुणे यांच्यात थेट संपर्क व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियंत्रण अधिक प्रभावी होणार आहे.
४९२ अधिकारी-कर्मचारी तैनात
परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी ६ झोनल अधिकारी, २५ सहाय्यक परिरक्षक, २५ केंद्रसंचालक तसेच ४९२ पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक आणि सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या भरारी पथकांकडून केंद्रांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा वाहन परवाना यापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे. मोबाईल, स्मार्ट घड्याळ, पेजर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा इतर प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.CCTV निरीक्षणामुळे चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याने मास्क, टोपी, बुरखा किंवा चेहरा झाकणारे साहित्य वापरण्यास परवानगी राहणार नाही.
यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि QR कोड असणार असून त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. OMR उत्तरपत्रिकेसोबत दोन कार्बन प्रती देण्यात येणार आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
परीक्षेसंदर्भातील कोणतीही माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळांवरूनच घ्यावी. सोशल मीडिया, यूट्यूब किंवा इतर माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परीक्षा नियंत्रक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रतनसिंग पवार यांनी केले आहे.

