Mahabreaking

[breaking_news]

Building ready for two years :दोन वर्षांपासून इमारत तयार, तरी सेवा बंद; साखरखेर्डा रुग्णालय सुरू करण्याची मागणी

Building ready for two years : सुमारे १८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करून परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक गैरसोय दूर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अंकुर उल्हासराव देशपांडे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Building ready for two years
५२ गावांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; अंकुर देशपांडे यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

साखरखेर्डा  : सुमारे १८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करून परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक गैरसोय दूर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अंकुर उल्हासराव देशपांडे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा हे सुमारे २० हजार लोकसंख्या असलेले मोठे व महत्त्वाचे गाव असून परिसरातील ५० ते ५२ खेड्यांचा व्यवहार या गावाशी निगडित आहे. या भागातील नागरिकांची आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाने सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी खर्च करून दोन वर्षांपूर्वी सुसज्ज व भव्य ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारली. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही हे रुग्णालय अद्याप कार्यान्वित झालेले नाही. परिणामी परिसरातील रुग्णांना उपचारासाठी दूरवरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असून आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी उपलब्ध नसल्याने तसेच नवीन भरतीनंतरच रुग्णालय सुरू करता येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्याचे अंकुर देशपांडे यांनी सांगितले.

साखरखेर्डा हे पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते. परिसरातील ५२ गावांतील नागरिक बाजारपेठ, शासकीय कामकाज, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत गरजांसाठी या गावावर अवलंबून आहेत. ग्रामीण रुग्णालय सुरू नसल्याने नागरिकांना उपचारासाठी ६० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, नव्या ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची त्वरित नियुक्ती करून आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी अंकुर देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून संबंधित आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याबाबत शासन कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top