Mahabreaking

[breaking_news]

Road worth lakhs exposed :लाखोंच्या रस्त्याची पहिल्याच पावसात पोलखोल; गिट्टी उखडली

Road worth lakhs exposed : शहरातील बुद्धूशाह बाबा–बाळादेवी मार्गावरील रस्ता तसेच नाल्यांवरील ढापांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेले हे काम पूर्ण होण्यापूर्वीच निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेली गिट्टी उखडू लागली असून अनेक ठिकाणी रस्ता खचण्याची चिन्हे दिसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Road worth lakhs exposed

 जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, बाळापूरकरांची मागणी

ज़ाकीर अहमद शेख

बाळापूर : शहरातील बुद्धूशाह बाबा–बाळादेवी मार्गावरील रस्ता तसेच नाल्यांवरील ढापांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेले हे काम पूर्ण होण्यापूर्वीच निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेली गिट्टी उखडू लागली असून अनेक ठिकाणी रस्ता खचण्याची चिन्हे दिसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महेस नदीलगत या मार्गावर अद्याप संरक्षण भिंत उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात रस्त्याचे मोठे नुकसान होण्याची तसेच रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील काम अपूर्ण असल्याने आणि नाल्यांवरील ढापे व्यवस्थित न बसविल्याने अपघाताचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या मार्गावरून शतरंजीपुरा, जावळी वेस, कसाई वेस, गाजीपुरा, घरकुल आणि बम्मनवाडी परिसरातील नागरिकांची दैनंदिन ये-जा होत असते. रस्त्याची सद्यस्थिती कायम राहिल्यास या भागांचा संपर्क धोक्यात येण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर परिषद बाळापूर तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अनेक वेळा भेट घेऊन या मार्गाच्या दुरवस्थेबाबत निवेदने व तक्रारी दिल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. संबंधित ठेकेदाराकडून केवळ खानापूर्ती करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, नगर परिषद प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे धाव घेतली आहे. सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करावी तसेच रस्ता व नाल्यांवरील ढापांचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन तसेच आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. “मुख्याधिकारी आणि अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे बुद्धूशाह बाबा–बाळादेवी मार्गाच्या प्रश्नासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच हस्तक्षेप करावा,” अशी आर्त मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top