Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच राज्यभरात धाड सत्र सुरू झाले आहे.15 दिवसातच भेसळखोरांवर कडक कारवाई सुरू झाली आहे. राज्यभर कारवाया होत असताना बुलढाणा जिल्ह्यात एकही कारवाइ झाली नाही. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. त्यातच शेगाव पोलिसांनी तब्बल 70 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासनालाही जाग आली असून देऊळगाव महित ५४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त केला आहे. तसेच दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभर कारवाया होत असताना बुलढाणा जिल्हा होता शांत ; पोलिसांनी गुटखा पकडल्यानंतर आली विभागाला जाग
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच राज्यभरात धाड सत्र सुरू झाले आहे.15 दिवसातच भेसळखोरांवर कडक कारवाई सुरू झाली आहे. राज्यभर कारवाया होत असताना बुलढाणा जिल्ह्यात एकही कारवाइ झाली नाही. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. त्यातच शेगाव पोलिसांनी तब्बल 70 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासनालाही जाग आली असून देऊळगाव महित ५४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त केला आहे. तसेच दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक २७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१५ जून रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३ वाजेदरम्यान देऊळगावमही येथील एका इमारतीची पंचासमक्ष झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये प्रिमियम नजर १००० पान मसाला, एन-०५ प्रिमियम च्युईंग तंबाखू, केसरयुक्त प्रिमियम नजर ९००० पान मसाला, विमल पान मसाला (किंग पॅक), व्ही-१ सुगंधित तंबाखू आणि राजनिवास सुगंधित पान मसाला असा विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला.या कारवाईत एकूण ५४ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल मानवी आरोग्यास अपायकारक असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो, असे अन्न व औषध प्रशासनाने नमूद केले आहे. तपासादरम्यान हा माल दुसऱ्या आरोपीकडून आणल्याची माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात अनेक वर्षांपासून प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. मात्र अशा प्रकारची मोठी कारवाई प्रथमच झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात मोहीम सुरू केल्यानंतरच या कारवाईला वेग आला का, अशी चर्चाही सर्वसामान्यांमध्ये रंगत आहे. या धडक कारवाईनंतर तालुक्यातील गुटखा विक्रेते आणि साठेबाजांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

