Storm wreaks : साखरखेर्डासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी घरांवरील व गोठ्यांवरील टिनपत्रे उडून गेली, तर वीजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; गावाचा वीज पुरवठा रात्रभर खंडीत
साखरखेर्डा : साखरखेर्डासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकरी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी घरांवरील व गोठ्यांवरील टिनपत्रे उडून गेली, तर वीजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रात्रभर अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, पिंपळगाव सोनारा, गोरेगाव, पांग्रीकाटे, बाळसमुंद्र, शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी, दरेगाव, सायाळा, राजेगाव, कंडारी, भंडारी आणि जागदरी या गावांमध्ये वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर शेतातील घरांवरील आणि गोठ्यांवरील टिनपत्रे उडून गेली.
सायंकाळच्या वेळी वादळ आल्याने शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची मोठी वाताहत झाली. घरांवरील छप्परे उडाल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गोठ्यांवरील टिनपत्रे उडाल्याने शेतकऱ्यांना सकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी धावपळ करावी लागली.
गोरेगाव येथील मनोहर पांचाळ यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली असून या घटनेत ते जखमी झाले. रात्रीच्या अंधारामुळे नुकसानग्रस्तांना आपले साहित्य सावरण्यास मोठा वेळ लागला. तसेच सत्यनारायण अग्रवाल यांच्या शेतातील सर्व टिनपत्रे उडून गेली असून अनेक पत्रे बेपत्ता झाली आहेत. त्यांच्या शेतातील चार वीज खांबही कोसळले.
पिंपळगाव सोनारा, शिंदी आणि मोहाडी या गावांमध्येही अनेक ठिकाणी वीज खांब पडले, तर मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले. परिणामी संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. साखरखेर्डा गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळीच पूर्ववत झाला. यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रात्रभर धावपळ करावी लागली.
दरम्यान, कंत्राटदारांनी दर्जेदार काम न केल्यामुळे साखरखेर्डा ३३ केव्ही उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात वारंवार वीज समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे रात्रभर अंधारात फॉल्ट शोधून दुरुस्ती करण्याचे काम करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. काही भागात पावसानेही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

