Amol Kumar Gavai : शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका घेणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेत समाजसेवक तथा विधिज्ञ ॲड. अमोलकुमार गवई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.

शेतकरी हक्कांच्या लढ्यासाठी नवी फळी सज्ज; बुलढाण्यात प्रवेश सोहळा उत्साहात
बुलढाणा : शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका घेणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेत समाजसेवक तथा विधिज्ञ ॲड. अमोलकुमार गवई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.
क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात ॲड. गवई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी, जनसेवा आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करणारे अभ्यासू नेतृत्व संघटनेसोबत जोडले जाणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगितले. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला यामुळे अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रवेश सोहळ्यात ॲड. प्रविण सुरडकर, ॲड. गुणवंत नाटेकर, ॲड. अक्षय तोत्रे, ॲड. राम अंभोरे, सुमित जुमडे, भूषण सोनुने आणि शाम सपकाळ यांनीही संघटनेत प्रवेश केला. त्यामुळे संघटनेची जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू आहे.
यावेळी तुपकर यांनी संघटनेच्या वाढत्या जनाधाराचा उल्लेख करत, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचे सांगितले. जनतेचा वाढता विश्वास हीच संघटनेच्या कार्याची खरी ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात शेतकरी प्रश्न, कृषी धोरणे आणि ग्रामीण भागातील विविध समस्या यावर संघटना अधिक आक्रमकपणे भूमिका घेणार असल्याचे संकेत या प्रवेश सोहळ्यातून मिळाले.

