Brother who murdered : बहीणीला दारुचे व्यसन असल्याने समाजात बदनामी होत होती.त्यामुळे संतप्त झालेल्या भावाने सख्ख्या बहीणीची गळा आवळून व चाकूने वार करून हत्या केल्याची घटना चार वर्षापूर्वी शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात घडली होती. या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सागर त्र्यंबक शर्मा असे आरोपी भावाचे नाव आहे तर अंकिता शर्मा असे मृतक बहीणीचे नाव आहे.

दारुचे व्यसनामुळे समाजात होत असलेल्या बदनामीमुळे भावाने केली होती बहीणीची हत्या
बुलढाणा : बहीणीला दारुचे व्यसन असल्याने समाजात बदनामी होत होती.त्यामुळे संतप्त झालेल्या भावाने सख्ख्या बहीणीची गळा आवळून व चाकूने वार करून हत्या केल्याची घटना चार वर्षापूर्वी शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात घडली होती. या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सागर त्र्यंबक शर्मा असे आरोपी भावाचे नाव आहे तर अंकिता शर्मा असे मृतक बहीणीचे नाव आहे.

प्रकरणानुसार, २८ जुलै २०२० रोजी आरोपी सागर त्र्यंबक शर्मा याने त्याची २८ वर्षीय सख्खी बहीण अंकिता शर्मा हिची निर्घृण हत्या केली होती. अंकिता हिला दारूचे व्यसन असल्यामुळे समाजात आणि मित्रपरिवारात कुटुंबाची बदनामी होत असल्याची भावना आरोपीच्या मनात होती. या रागातून त्याने गुन्ह्याचे नियोजन केल्याचे तपासात समोर आले.
घटनेच्या दिवशी आरोपीने प्रथम आई कोकिळा जाधव-शर्मा आणि अंकिताच्या मुलांना घराबाहेर पाठविले. त्यानंतर अंकिताचा केबल वायरने गळा आवळून तसेच चाकूने वार करून खून केला. गुन्ह्यानंतर मृतदेह घरातील बाथरूममध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबाला, विशेषतः मृत महिलेच्या मुलांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्यात जिल्हा सरकारी वकील व्ही. एल. भटकर यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी बाजू मांडली. एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीची आई कोकिळा जाधव-शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सावळे आणि तपास अधिकारी पीएसआय अमित जाधव यांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या प्रकरणाच्या तपासात पीएसआय अमित जाधव आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

