Strict enforcement : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील प्रमुख एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग’ नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त मोहिमेत आतापर्यंत ११७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११७ वाहनांवर कारवाई ; १५ जूनपर्यंत विशेष तपासणी मोहीम
बुलढाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील प्रमुख एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग’ नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त मोहिमेत आतापर्यंत ११७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात होत असलेल्या घटीकडे शासनाने गांभीर्याने पाहिले असून, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशांनुसार राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बसस्थानक परिसरातील २०० मीटर क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक, प्रवासी चढ-उतार आणि बेकायदेशीर पार्किंगला आळा घालण्यावर भर देण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयाची गंभीर दखल घेत मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यात ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथके सातत्याने कारवाई करत आहेत. बुलढाणा, धाड, चिखली, देऊळगाव राजा, अमडापूर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव येथील प्रमुख बसस्थानकांच्या परिसरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
अवैध वाहतुकीला आळा घालून एस.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढील काळातही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे.

