Substandard road : शहरातील कसाईबेस–बाला देवी–महेस नदी परिसरातील रस्ता तसेच नाल्यांवरील ढापांच्या बांधकामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, मान्सूनपूर्वी काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पावसापूर्वी काम पूर्ण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
बाळापूर : शहरातील कसाईबेस–बाला देवी–महेस नदी परिसरातील रस्ता तसेच नाल्यांवरील ढापांच्या बांधकामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, मान्सूनपूर्वी काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लाखो रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या या कामात रस्त्यावर टाकण्यात आलेली जाड गिट्टी अवघ्या काही दिवसांत उखडू लागली आहे. तसेच महेस नदीलगत आवश्यक संरक्षण भिंत उभारण्यात न आल्याने रस्त्याचा काही भाग नदीच्या दिशेने खचत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, येत्या काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण राहिलेल्या भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास रस्ता आणखी खचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनंतर काही ठिकाणी गिट्टी व बोल्डर टाकून केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचा आरोप होत असून, प्रत्यक्षात काम अद्यापही अपूर्ण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नदीलगत संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यास भविष्यात संपूर्ण रस्ता वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
सदर रस्ता हा जुन्या शहरातील अनेक भागांसाठी महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. शतरंजीपुरा, जावळी वेस, कसाई वेस, गाजीपुरा, घरकुल आणि बम्मनवाडी या भागांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. याशिवाय शेगाव–वाशीम मार्गावरील अनेक दुचाकी व चारचाकी वाहनेही याच रस्त्याने प्रवास करतात.
रस्ता खचल्यास किंवा वाहून गेल्यास या भागांचा संपर्क विस्कळीत होण्याची शक्यता असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
नागरिकांनी नगर परिषद बांधकाम विभागाला तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारामार्फत रस्ता व नाल्यांवरील ढापांचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण करून दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, धरणे आंदोलन तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, मान्सूनपूर्वी या मार्गावरील काम पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

