Mahabreaking

[breaking_news]

The rains have turned hostile :पावसाने डोळे वटारले; मृग नक्षत्रात तळपत्या उन्हात घामाच्या धारा

The rains have turned hostile : संपूर्ण रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्रात पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, मृग नक्षत्रही कोरडेच जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. आजही तळपत्या उन्हामुळे घामाच्या धारा वाहत असून, संभाव्य दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे.

The rains have turned hostile

 पेरणी लांबली, कृषी सेवा केंद्रांत शुकशुकाट; रोहिणी कोरडी, मृगही निराशाजनक

अशोक इंगळे  

साखरखेर्डा : संपूर्ण रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्रात पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, मृग नक्षत्रही कोरडेच जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. आजही तळपत्या उन्हामुळे घामाच्या धारा वाहत असून, संभाव्य दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे.

मागील वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. त्या वेळी मे महिन्यात तब्बल २५० मिमी पावसाची नोंद झाली होती. नदी-नाले खळखळून वाहत होते. कपाशीची लागवड मे महिन्यातच जवळपास पूर्ण झाली होती, तर सोयाबीन पेरणीची लगबग सुरू झाली होती. मूग, उडीद, मका आणि ज्वारीची पेरणी १० जूननंतर सुरू झाली होती.

मे महिन्यात नांगरणी, वखरणी व कल्टीवेटरच्या साहाय्याने शेतीची मशागत पूर्ण करून शेतकरी मोकळे झाले होते. मात्र, यावर्षी शेतात नांगरणीची ढेकळे कायम असून ती जिरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यानंतरच मशागत करून पेरणीयोग्य स्थिती निर्माण होऊ शकते.

मे महिना पूर्णपणे कोरडा गेला असून जून महिन्याची ९ तारीख उजाडली तरी पावसाचा पत्ता नाही. अनेक हवामान तज्ज्ञांनी १ जूनपासून संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच ७ जूनपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला होता. मात्र, रोहिणी नक्षत्र कोरडे गेले आणि मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

शेतकरी चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसला असला तरी ढगही दिसत नाहीत. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून त्यामध्ये सोयाबीन ३५ हजार हेक्टर, कपाशी २० हजार हेक्टर, मूग ५०० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर आणि ज्वारी ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यावर्षी हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून साखरखेर्डा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, उमनगाव, पांग्रीकाटे, बाळसमुद्र, पिंपळगाव सोनारा, शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी आणि दरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करण्यात आली आहे. किमान दोन हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

अनेक शेतकऱ्यांनी हळदीचे बियाणे खरेदी करून लागवड केली आहे. मात्र, विहिरींची पाणीपातळी खालावल्याने सिंचनासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मोटारपंप सुरू केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार आहे.

कृषी पंपांसाठी सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी मोहाडी येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप आण्णा काळे आणि गुंज येथील हळद उत्पादक गुलाबराव तुपकर यांनी केली आहे.

दरम्यान, जांभोरा, चांगेफळ, वर्दडी आणि सोनोशी परिसरात काही शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली असून, आता सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top