Deforestation drives monkeys : जंगलांचा ऱ्हास, अन्न व पाण्याची टंचाई यामुळे जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. साखरखेर्डा परिसरातही वानरांचा वावर वाढला असून, गेल्या एका महिन्यात दोन वानर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्थानिक प्राणी-पक्षी मित्रांच्या तत्परतेमुळे या दोन्ही वानरांचे प्राण वाचले असून त्यांना उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अन्न-पाण्याच्या शोधात वानर सेना गावात; साखरखेर्ड्यात प्राणीमित्रांची तत्परता
साखरखेर्डा : जंगलांचा ऱ्हास, अन्न व पाण्याची टंचाई यामुळे जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. साखरखेर्डा परिसरातही वानरांचा वावर वाढला असून, गेल्या एका महिन्यात दोन वानर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्थानिक प्राणी-पक्षी मित्रांच्या तत्परतेमुळे या दोन्ही वानरांचे प्राण वाचले असून त्यांना उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास साखरखेर्डा येथील कै. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाजवळ एका अज्ञात वाहनाने वानराला धडक दिली. या अपघातात वानर गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत पडलेल्या वानराभोवती काही वेळातच मोकाट कुत्र्यांचा कळप जमा झाला. कुत्र्यांकडून वानरावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात येताच रामभाऊ मंडळकर यांनी तातडीने कुत्र्यांना हुसकावून लावले आणि प्राणी-पक्षी मित्र गजानन इंगळे यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच गजानन इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पवन बेंदाडे यांना बोलावून जखमी वानरावर प्राथमिक उपचार करून घेतले. त्यानंतर वनविभागाची मदत मिळेपर्यंत वानराला सुरक्षिततेच्या दृष्टीने रामभाऊ मंडळकर यांच्या घरी ठेवण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी, मेहकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने येऊन वानराला पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, याच महिन्यात आणखी एका जखमी वानराला स्थानिक नागरिकांनी मदत केली होती. ते वानर जखमी अवस्थेत एका घरातील स्वच्छतागृहात येऊन बसले होते. त्यावेळीही वनविभागाशी संपर्क साधून त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले होते.
परिसरातील नागरिकांच्या मते, जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने जंगली प्राण्यांना अन्न व पाण्यासाठी गावांकडे यावे लागत आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संपर्क वाढत असून अशा परिस्थितीत नागरिकांनी संवेदनशीलता दाखवत जखमी किंवा अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना मदत करणे आवश्यक आहे.
स्थानिक प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे दोन जखमी वानरांचे प्राण वाचल्याने त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

