Car rams violently: समृद्धी महामार्गावर नियमांचे उल्लंघन करून उभ्या करण्यात आलेल्या आयशर ट्रकला अर्टिगा कारची पाठीमागून भीषण धडक बसल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी (दि. ७ जून) मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास आंध्रूड शिवारातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २७३.०२ जवळ घडली.

नियमबाह्य पार्किंग जीवावर बेतले; आंध्रूड शिवारातील घटना
डोणगाव : समृद्धी महामार्गावर नियमांचे उल्लंघन करून उभ्या करण्यात आलेल्या आयशर ट्रकला अर्टिगा कारची पाठीमागून भीषण धडक बसल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी (दि. ७ जून) मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास आंध्रूड शिवारातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २७३.०२ जवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत अर्जुन चव्हाण (वय ३८, रा. मोख, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) यांचे नातेवाईक अर्टिगा कार (क्र. MH-29-BP-5543) मधून समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत होते. त्यावेळी आंध्रूड शिवाराजवळ आयशर ट्रक (क्र. MH-15-BJ-7665) महामार्गावर उभा असल्याचे समोर आले.
आरोपानुसार, ट्रक चालकाने महामार्गावर वाहन उभे करण्यास मनाई असतानाही निष्काळजीपणे ट्रक रस्त्यावर उभा केला होता. तसेच रात्रीच्या वेळी वाहन दिसावे यासाठी आवश्यक असलेले इंडिकेटर, पार्किंग लाईट किंवा अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अंधारात उभा असलेला ट्रक कार चालकाच्या निदर्शनास न आल्याने अर्टिगा कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात कृष्णा संगीत राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी ई-साक्ष नोंदवून आयशर चालकाविरुद्ध अपराध क्रमांक १७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६, २८१, १२५ (१), १२५ (ब) आणि ३२४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

