Janefal Police : पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील ग्राम पाथर्डी (ता. मेहकर) येथे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर जानेफळ पोलिसांनी धडक कारवाई करत 12 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मेहकर : पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील ग्राम पाथर्डी (ता. मेहकर) येथे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर जानेफळ पोलिसांनी धडक कारवाई करत 12 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन जानेफळचे ठाणेदार आदिनाथ मोरे यांना ग्राम पाथर्डी येथे अवैधरित्या हातभट्टी दारूची निर्मिती व साठवणूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुधवारी (3 जून) छापा टाकला.
या कारवाईत दत्ता उत्तम चव्हाण (वय 52, रा. पाथर्डी, ता. मेहकर) याच्या ताब्यातून 9 लिटर हातभट्टी दारू, एक प्लास्टिक कॅन, 230 लिटर गुळमिश्रित मोह सडवा तसेच 16 टपरी पिपे असा एकूण 12 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्रमांक 181/2026 नोंदविण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 (फ) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी दिली असून गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ काकड यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.
ही कारवाई ठाणेदार आदिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जगताप यांनी संयुक्तपणे पार पाडली. अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

