ToD Meters : बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले महावितरणचे स्मार्ट मीटर वीज ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. स्मार्ट मीटर हा पर्याय नसून नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी आवश्यक असल्याचे मत मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच, स्मार्ट मीटरबाबत गैरसमज करून न घेता मीटर बसविण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

महावितरणचे स्मार्ट वीजमीटर पारदर्शक; ग्राहकांच्या आर्थिक बचतीसाठी उपयुक्त
गजानन तिडके
बुलढाणा : बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले महावितरणचे स्मार्ट मीटर वीज ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. स्मार्ट मीटर हा पर्याय नसून नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी आवश्यक असल्याचे मत मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच, स्मार्ट मीटरबाबत गैरसमज करून न घेता मीटर बसविण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

स्मार्ट मीटर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्याच्या मासिक रिडिंग प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप राहत नाही. मीटरचे वाचन स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने ग्राहकांना शंभर टक्के अचूक आणि वेळेवर वीजबिल मिळणे शक्य झाले आहे. परिणामी, सरासरी वीजबिल, वेळेत रिडिंग न होणे, फॉल्टी मीटर अशा वीजबिलाशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वीज वापरावर प्रति युनिट ‘टाइम ऑफ डे’ (ToD) सवलत दिली जाते. ही सुविधा केवळ स्मार्ट मीटरधारक ग्राहकांनाच उपलब्ध आहे. जुलै २०२५ पासून प्रति युनिट ८० पैशांची सवलत लागू करण्यात आली होती. त्यामध्ये एप्रिल २०२६ पासून वाढ होऊन ती आता प्रति युनिट ८५ पैसे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मासिक वीजबिलात बचत होत असून त्याचा थेट आर्थिक फायदा ग्राहकांना मिळत आहे.
याशिवाय, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दर तासाचा वीज वापर मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचे नियोजन करणे ग्राहकांना अधिक सोपे झाले आहे.
परिमंडळात एकूण ३ लाख ४० हजार ३०० स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये २ लाख ७४ हजार ४३२ ग्राहकांचे जुने मीटर बदलून स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात अकोला जिल्ह्यात ८५ हजार ९५६, बुलढाणा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१२ आणि वाशिम जिल्ह्यात ४६ हजार ८६४ मीटरचा समावेश आहे.
नवीन वीजजोडणीसाठी ६५ हजार १०५ स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १९ हजार ३१३, बुलढाणा जिल्ह्यात ३२ हजार १७१ आणि वाशिम जिल्ह्यात १३ हजार ६२१ मीटरचा समावेश आहे. याशिवाय, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुनर्जोडणी घेतलेल्या ग्राहकांना ३२९ मीटर बसविण्यात आले आहेत. उच्चदाबाच्या ३९३ ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले असून ४१ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देताना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. तसेच, वीज वापराचे अचूक मापन करण्यासाठी उपकेंद्र, फीडर आणि रोहित्रांनाही स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल जास्त येते, हा समज चुकीचा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. हे मीटर केवळ वापरलेल्या विजेचे अचूक मोजमाप करते. या मीटरसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच, स्मार्ट टीओडी मीटर बसविणे सर्व ग्राहकांसाठी अनिवार्य असून ग्राहकांच्या मनात याबाबत शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

