Cash and Documents Stolen : मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना देऊळगाव मही येथील मुंगसाजी पतसंस्थेजवळ घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

१७ हजार रुपये केले लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
देऊळगाव राजा : मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना देऊळगाव मही येथील मुंगसाजी पतसंस्थेजवळ घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लहु तेजराव साळवे (वय ४६, रा. पिंपरी आंधळे, व्यवसाय – मजुरी) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३० मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास मुंगसाजी पतसंस्थेजवळ त्यांनी मोटारसायकल उभी केली होती. त्यावेळी मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली १७ हजार रुपयांची रोकड तसेच त्यांच्या मुलीचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि भारतीय स्टेट बँकेचे पासबुक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून आणि आकस्मिक नोंद क्रमांक १०२/२०२६च्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार जाधव यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत. परिसरातील माहिती संकलित करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

