Hit by Diesel Shortage: शासनाकडून डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना ग्रामीण भागात मात्र डिझेल टंचाईचे चित्र कायम असल्याचे समोर येत आहे. पंपावर सलग दोन ते तीन दिवस डिझेल उपलब्ध नसल्याने आणि कॅनमधून डिझेल देण्यास मनाई असल्याने आरेगाव येथील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आपली अडचण मांडत थेट ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठल्याची घटना घडली आहे.

पंपावर डिझेल नसल्याने शेतकऱ्याची अनोखी शक्कल; आरेगावच्या शेतकऱ्याचा अनोखा निषेध चर्चेत
डोणगाव : शासनाकडून डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना ग्रामीण भागात मात्र डिझेल टंचाईचे चित्र कायम असल्याचे समोर येत आहे. पंपावर सलग दोन ते तीन दिवस डिझेल उपलब्ध नसल्याने आणि कॅनमधून डिझेल देण्यास मनाई असल्याने आरेगाव येथील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आपली अडचण मांडत थेट ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून पेट्रोल पंप गाठल्याची घटना घडली आहे.
आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांच्या ट्रॅक्टरमधील डिझेल शेतातच संपले. पंपावरून कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने त्यांनी बैलगाडीच्या सहाय्याने ट्रॅक्टर ओढत डिझेल पंप गाठला. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
यावेळी शेतकरी विनायकराव टाले यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गावातच टँकरद्वारे डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी तातडीने डिझेलची गरज असते, मात्र पंपावर उपलब्धता नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंप चालक हमीद कुरेशी यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली. शासनाची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांना मर्यादित प्रमाणात, म्हणजे सुमारे १० लिटरपर्यंत डिझेल कॅनमधून देण्यास आम्ही तयार आहोत; मात्र कॅनमधून डिझेल विक्रीला मुभा दिल्यास काहीजण साठेबाजी किंवा काळाबाजार करू शकतात. त्यामुळे शासनाने यावर स्पष्ट धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर डिझेल पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

