Mahabreaking

[breaking_news]

Now, the Wait for Rain :आता वाट पावसाची! देऊळगाव राजा तालुक्यात ३६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

Now, the Wait for Rain : खरिपाची पेरणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी शेती मशागतीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून पेरणीपूर्व तयारी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तालुका कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा तालुक्यात एकूण ३६ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे.

Now, the Wait for Rain

मृग नक्षत्राची प्रतीक्षा; मशागत अंतिम टप्प्यात, कपाशीचा पुन्हा राहणार बोलबाला

गजानन तिडके

देऊळगाव राजा : खरिपाची पेरणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी शेती मशागतीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून पेरणीपूर्व तयारी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तालुका कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा तालुक्यात एकूण ३६ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर अपूर्ण राहिलेली मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. मृग नक्षत्रात वेळेवर पेरणी करता यावी, यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची लगबग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे वाढते तापमान, तर दुसरीकडे काही भागांत डिझेलची टंचाई व वाढते दर या अडचणी बळीराजासमोर उभ्या असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे मशागतीच्या कामांना गती मिळाली असून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीची तयारी पूर्ण केली आहे. बियाणे, खते व शेती अवजारे साठवून ठेवण्यात आली असून आता केवळ वेळेवर पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.

 

तालुक्यात कपाशीचाच बोलबाला राहणार 

देऊळगाव राजा तालुक्याची ओळख असलेली कपाशी यंदाही आघाडीवर राहणार असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही कपाशीचे वर्चस्व कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदा सुमारे १७ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकावर सोयाबीनचे १४ हजार २९६ हेक्टर, तर मूग ५३४ हेक्टर आणि उडीद ३९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • पीक      क्षेत्र (हेक्टर)
  • एकूण क्षेत्र           ३६,४२२
  • कपाशी              १७,४५७
  • सोयाबीन            १४,२९६
  • मूग                        ५३४
  • उडीद                         ३९२

फळबागांना फटका; आंबा पिकाचे नुकसान

मे महिन्यात काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळाली असली तरी फळबागांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. विशेषतः आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद असून काही भागांत भुईमूग व उन्हाळी बाजरीलाही परिणाम सहन करावा लागला आहे.

 

“मौसमी स्थिती लक्षात घेता शेतकरी पेरणीस सज्ज आहेत. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांनी हवामानाच्या पुढील स्थितीनुसार शिफारशीनुसार पेरणी करावी. कृषी विभागाकडून योग्य बियाणे, खते आणि तांत्रिक मार्गदर्शन पुरवले जात आहे.”

— कृणाल चिंचोले, कृषी अधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा

“आधीच मशागत पूर्ण केली आहे. खतं-बियाणंही साठवून ठेवली आहेत. आता मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास वेळेत पेरणी करणे शक्य होईल.”

— महादू तिडके, शेतकरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top