Farm Road Dispute Ends : तालुक्यातील मौजे निमखेड येथील तब्बल ३५ वर्षांपासून वादग्रस्त असलेला शेतरस्ता अखेर मोकळा करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर” अंतर्गत प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने महसूल विभागाने सकारात्मक पुढाकार घेत ही कार्यवाही केली.

महसूल प्रशासनाचा पुढाकार; ६० ते ७० शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा प्रश्न निकाली
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील मौजे निमखेड येथील तब्बल ३५ वर्षांपासून वादग्रस्त असलेला शेतरस्ता अखेर मोकळा करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर” अंतर्गत प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने महसूल विभागाने सकारात्मक पुढाकार घेत ही कार्यवाही केली.
देऊळगाव राजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या आदेशानुसार तसेच मंडळ अधिकारी रामदास मांटे यांच्या पुढाकारातून मौजे निमखेड येथील “निमखेड ते गिरोली खुर्द” हा अंदाजे दीड किलोमीटर लांबीचा गाडी रस्ता खुला करण्यात आला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात उपस्थित होते.
सदर रस्ता मोकळा झाल्यामुळे परिसरातील सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाण्या-येण्याचा तसेच शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न महसूल प्रशासनाच्या समन्वयात्मक आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
महसूल प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखत सर्व संबंधित पक्षांशी संवाद साधून संयमाने आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या कार्यवाहीतून दिसून आल्याचे मत ग्रामस्थांनी नोंदविले.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत महसूल विभागाने जनतेचा विश्वास संपादन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

