Mahabreaking

[breaking_news]

Padmavati-Masrul Dam :पद्मावती-मासरूळ धरणात ३० टक्के पाणीसाठा; ३२ गावांना दिलासा

Padmavati-Masrul Dam : बुलढाणा तालुक्यात मराठवाडा-विदर्भ सीमेवर असलेल्या पद्मावती-मासरूळ धरणात सध्या सुमारे ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणातून मराठवाडा व विदर्भातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात असून, सध्या कोणत्याही प्रकारच्या पाणीटंचाईचा धोका नसल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Padmavati-Masrul Dam

  परिसरातील गावांवर ‘पिण्याच्या पाण्याचे संकट नाही’

पंडीत सावळे

मासरूळ  : बुलढाणा तालुक्यात मराठवाडा-विदर्भ सीमेवर असलेल्या पद्मावती-मासरूळ धरणात सध्या सुमारे ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणातून मराठवाडा व विदर्भातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात असून, सध्या कोणत्याही प्रकारच्या पाणीटंचाईचा धोका नसल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

या धरणावर आधारित सुमारे ३२ गावांची पाणीपुरवठा योजना असून, मासरूळ, धामणगाव, सोयगाव, पांगरखेड, वरुड जामठी, तराडखेड, गुम्मी, पारध, पद्मावती, वालसावंगी, सुंदरवाडी यांसह दहा ते पंधरा गावांना सध्या नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. धरणाची पातळी खोल असल्याने आणि पाणीपुरवठ्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पावसाळ्यापूर्वी पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या उद्भवते. मात्र धरण परिसरातील बहुतांश पाणीपुरवठा विहिरींना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध असून, धरणातील पाणीसाठा कमी झाला तरी या विहिरींवर त्याचा तात्काळ परिणाम होत नाही. धरणाची पातळी ५ टक्क्यांपर्यंत खाली गेल्यानंतरही अनेक विहिरींमधून पाणीपुरवठा सुरू राहतो, असे स्थानिकांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रिया देताना शकुंतलाबाई महाले यांनी सांगितले की, “मासरूळ पद्मावती धरणात ३० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. मासरूळसह परिसरातील गावांना सध्या पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विहिरींनाही पुरेसे पाणी उपलब्ध असून पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही.” परिसरातील नागरिकांनीही उपलब्ध पाणीसाठ्यामुळे समाधान व्यक्त करत प्रशासनाने नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top