Resolve to Celebrate Bakri Eid Peacefully : आगामी Eid al-Adha (बकरी ईद) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळापूर पोलीस स्टेशनतर्फे रविवारी सायंकाळी दर्गा चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था आणि परस्पर सौहार्द कायम राखण्यावर भर देण्यात आला.

बकरी ईदपूर्वी बाळापूरात शांतता समिती बैठक; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट टाळण्याचे आवाहन
जाकीर अहमद
बाळापूर : आगामी Eid al-Adha (बकरी ईद) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळापूर पोलीस स्टेशनतर्फे रविवारी सायंकाळी दर्गा चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सामाजिक सलोखा, कायदा-सुव्यवस्था आणि परस्पर सौहार्द कायम राखण्यावर भर देण्यात आला.
सायंकाळी ६.४० ते ७.४० या वेळेत झालेल्या बैठकीत बकरी ईददरम्यान गोवंशाची कुर्बानी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच इतर जनावरांच्या कुर्बानीचे छायाचित्रण अथवा दृक्चित्रफीत (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रसारित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. धार्मिक भावना दुखावतील अथवा सामाजिक वातावरण बिघडेल, अशा कोणत्याही कृतीपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.
कुर्बानीनंतर निर्माण होणारे अवशेष व कचरा तातडीने उचलण्यासाठी नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, यासंदर्भात संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त माहिती, छायाचित्रे अथवा दृक्चित्रफीत प्रसारित झाल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, तसेच किरकोळ वाद स्थानिक पातळीवर परस्पर संवादातून शांततेने सोडवावेत, असेही आवाहन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईद उत्सव शांततेत, बंधुभावाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याचा निर्धार दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केला. बैठकीस नगरपरिषद बाळापूरचे उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे, विविध विभागांचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे सुमारे ४५ ते ५० सदस्य उपस्थित होते.
बाळापूर शहरातील धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम राखत उत्सव शांततेत पार पडावा, असा सकारात्मक संदेश या बैठकीतून देण्यात आला.

