The Municipal Council : पावसाळ्यात शहरातील नाले व नाल्यांमधून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जावे आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी देऊळगाव राजा नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील मोठ्या नाल्यांसह अंतर्गत नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून त्यासाठी नियोजनबद्ध सर्वेक्षणही करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व गटनेत्यांच्या पुढाकाराने नियोजनबद्ध कामास प्रारंभ
देऊळगाव राजा : पावसाळ्यात शहरातील नाले व नाल्यांमधून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जावे आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी देऊळगाव राजा नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील मोठ्या नाल्यांसह अंतर्गत नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून त्यासाठी नियोजनबद्ध सर्वेक्षणही करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष माधुरीताई शिपने, उपाध्यक्ष वनीताताई भुतडा, गटनेते प्रदीप वाघ तसेच संबंधित समितीचे सभापती संदीप शिंदे यांच्या पुढाकाराने या कामांना गती देण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी कामावर स्वतः लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यांच्या मान्सूनपूर्व साफसफाईचे नियोजन करण्यात आले असून मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने साफसफाईचे काम सुरू आहे. तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या अंतर्गत नाल्यांची स्वच्छताही सफाई कर्मचाऱ्यांमार्फत केली जात आहे.
पावसाळ्यात नाले तुंबणे, सांडपाणी रस्त्यावर येणे किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा अडथळ्यामुळे थांबणे यांसारख्या समस्या टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने विशेष दक्षता घेतल्याची माहिती मुख्याधिकारी अरुण मोकळ आणि आरोग्य निरीक्षक जतीन नकवाल यांनी दिली.
दरम्यान, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते व आरोग्य समिती सभापती हे साफसफाईच्या कामावर नियमित लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांना वेळोवेळी सूचना देत आहेत. नागरिकांनी कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये न टाकता घंटागाडीतच टाकावा आणि नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.

