Hardened Criminals : शहरातील लक्ष्मीनारायण नगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरी करताना प्रतिकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या अटल गुन्हेगारांना मेहकर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

मेहकर पोलिसांची २४ तासांत दमदार कारवाई; घरफोडीचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटकेत
मेहकर : शहरातील लक्ष्मीनारायण नगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरी करताना प्रतिकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या अटल गुन्हेगारांना मेहकर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी पहाटे सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये काही चोरटे शिरल्याची माहिती रात्रगस्तीदरम्यान असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांकडून मिळाली. यानंतर रात्रगस्त अधिकारी व चालक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी प्रतिकार करत पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेत आरोपींनी सुमारे तीन तोळे चांदीचे दागिने, अंदाजे ६ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच सुमारे ६० हजार रुपये किमतीची ड्रिम युगा मोटारसायकल चोरी करून नेल्याचे समोर आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठ्या घरफोडीच्या घटना टळल्याचेही सांगण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करून रवाना केली.
तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाने सिंदखेड राजा येथून देशपालसिंग अजयपालसिंग भादा (वय २०, रा. सिंदखेड राजा) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार दिगंबर चव्हाण यांना दोन आरोपी बिबी येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मेहकर पोलीस व बिबी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत धर्मेंद्रसिंग कालूसिंग बावरी (वय २५) आणि अजितसिंग राजुसिंग टाक (वय २०, दोघे रा. बिबी) यांना ताब्यात घेऊन मेहकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी मेहकर पोलीस ठाण्याची दोन पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार व विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

