Murder : यावलखेड रेल्वेमार्गाजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव मंजू पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. मृत तरुणाची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ येथून आरोपीला अटक करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाची प्रशंसा होत आहे.

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत आरोपीला केले गजाआड; गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी
संजय तायडे
बोरगाव मंजू : यावलखेड रेल्वेमार्गाजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव मंजू पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. मृत तरुणाची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ येथून आरोपीला अटक करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाची प्रशंसा होत आहे.
२२ मे रोजी यावलखेड लोहमार्ग परिसरात एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. संबंधित युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बोरगाव मंजू ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणातील मृतक आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस धागादोरा नसल्याने तपास आव्हानात्मक ठरत होता. मात्र बोरगाव मंजू पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी समांतर तपास सुरू ठेवत अकोला जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा केली. तपासादरम्यान गोपनीय सूत्रांकडून यवतमाळ येथील विक्की उर्फ बबलू राजू भेंडे (वय १९, रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) हा २१ मेच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांनी यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तपासाची माहिती पडताळली. त्यावरून यावलखेड परिसरात आढळलेला अनोळखी मृतदेह हा विक्की उर्फ बबलू भेंडे याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान मृतकासोबत कोणाचा वाद झाला होता का, याबाबत माहिती घेत असताना मृतकाचा शेजारी राहणारा युवराज शंकर तांगडे (वय ४१, रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) याच्यासोबत त्याचे वाद झाल्याचे समोर आले. त्यानंतर यवतमाळ पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथे चौकशीसाठी आणण्यात आले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने मृतकाचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करत दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला बोरगाव मंजू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि विष्णु बोडखे, जीपीएसआय दशरथ बोरकर, पोलीस अमंलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहेमद, राजसिंह चंदेल, राहुल गायकवाड, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, अशोक सोनवणे, अमोल दिपके चालक ग्रेड पो.उप.नि. विनोद ठाकरे, रामकिशन डोईफोडे, देवानंद खरात, मनिष ठाकरे यांनी केली.

