Depositors Money Pilfered : देऊळगावमही येथील सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये तब्बल २ कोटी ९३ लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे समारे आले आहे. वैधानिक लेखापरीक्षणादरम्यान उघड झालेल्या अनियमिततेच्या आधारे व्यवस्थापक, कर्मचारी, दैनंदिन ठेव एजंट, संचालक मंडळ सदस्य आणि कर्जदार सभासद अशा एकूण ५५ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेखापरीक्षणात धक्कादायक खुलासा; सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगावमही येथील सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये तब्बल २ कोटी ९३ लाखांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे समारे आले आहे. वैधानिक लेखापरीक्षणादरम्यान उघड झालेल्या अनियमिततेच्या आधारे व्यवस्थापक, कर्मचारी, दैनंदिन ठेव एजंट, संचालक मंडळ सदस्य आणि कर्जदार सभासद अशा एकूण ५५ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (सहकारी संस्था-साखर) सौ. ए. एम. व्यथ हारे (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक २३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, देऊळगावमही (नोंदणी क्रमांक ६८०) या संस्थेच्या १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षणात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आढळून आली. लेखापरीक्षण अहवालानुसार संस्थेतील व्यवस्थापक, कर्मचारी, दैनंदिन ठेव एजंट, संचालक मंडळ व काही कर्जदार सभासद यांच्या कथित गैरकारभारामुळे सुमारे रु. २,९३,०१,९३४ इतक्या रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या आदेशानंतर लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर सादर झालेल्या अहवालांच्या आधारे सहायक निबंधक, सहकारी संस्था, देऊळगाव राजा यांनी संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी प्राधिकृत पत्र जारी केले होते. जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता यांच्या अभिप्रायानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३३८, ३३९, ३४०(१), ३४०(२), ३४४, ३१८(४) तसेच महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम १९६० मधील कलम १४६ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ मधील कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, प्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत. आर्थिक गैरव्यवहारातील नेमकी जबाबदारी, निधीचा वापर आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

