Teacher Safety Issue Takes Center : अकोला येथे जनगणना कार्यादरम्यान एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला दुर्दैवी मृत्यू राज्यभरात हळहळ व्यक्त करणारी घटना ठरत असताना शिक्षकांच्या सुरक्षितता आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

अकोल्यातील दुर्दैवी घटनेची दखल; शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा ताण कमी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : अकोला येथे जनगणना कार्यादरम्यान एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला दुर्दैवी मृत्यू राज्यभरात हळहळ व्यक्त करणारी घटना ठरत असताना शिक्षकांच्या सुरक्षितता आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
अकोला येथे जनगणना कार्यादरम्यान शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनेचा गंभीर उल्लेख करत भोयर यांनी शिक्षकांवर वाढत चाललेल्या अतिरिक्त शासकीय जबाबदाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली. जनगणना, निवडणूक, विविध सर्वेक्षणे यांसारख्या अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांवर मोठा मानसिक व शारीरिक ताण येत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः जनगणना, निवडणूक किंवा इतर शासकीय कामांमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा प्रोटोकॉल तसेच विशेष विमा संरक्षण योजना लागू करण्याचा प्रस्ताव निवेदनात मांडण्यात आला.
तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त शासकीय कामांतून सूट देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. आरोग्याशी संबंधित धोके लक्षात घेता अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या देताना शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे भोयर यांनी नमूद केले.
याशिवाय राज्यातील GPF, NPS किंवा DCPS खाते नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यांची रक्कम थेट वेतन खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
अकोल्यातील दुर्दैवी घटनेनंतर शिक्षकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या ताणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षक वर्गाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

