Rage Over Love Marriage : शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात घडलेल्या राहुल कालू सारसर खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रेमविवाहातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून कट रचून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई: चार आरोपींना ठोकल्या बेड्या
अकोला : शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात घडलेल्या राहुल कालू सारसर खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रेमविवाहातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून कट रचून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ मे २०२६ रोजी अलंकार मार्केटमधील राज मंदिर बारच्या गल्लीत राहुल कालू सारसर याच्यावर लोखंडी पाईप व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलचा मृत्यू झाला. मृत राहुलने आरोपींच्या भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून आरोपींनी कटकारस्थान रचत गैरकायदेशीर जमाव तयार करून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार आरोपींचा तातडीने शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पहिला आरोपी बादशहा सरु पारोचे (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला १६ मे रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे समोर आले.
दरम्यान, उर्वरित आरोपी भुसावळ परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत जळगाव-भुसावळ महामार्गावर सापळा रचला. या कारवाईत संतोष रामचरण पारोचे (वय २४, रा. विजय नगर, तारफैल, अकोला), गौरव राहुल करोसिया (वय १८) आणि हरीश उर्फ हर्षऊ राहुल करोसिया (वय २०, दोघे रा. आंबेडकर नगर, वरणगाव, जि. जळगाव) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने केली.

