State Bank of India : भारतीय स्टेट बँकेच्या देऊळगाव राजा शाखेत १८ मे रोजी ग्राहक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. शहरातील दोन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात ग्राहकांना बँकेच्या विविध योजना, डिजिटल व्यवहार आणि सेवा सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

देऊळगाव राजा : भारतीय स्टेट बँकेच्या देऊळगाव राजा शाखेत १८ मे रोजी ग्राहक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. शहरातील दोन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात ग्राहकांना बँकेच्या विविध योजना, डिजिटल व्यवहार आणि सेवा सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संमेलनात बुलढाणा येथील क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक सौरभ सुरेंद्र आणि उपव्यवस्थापक प्रवीण नवले यांनी उपस्थित ग्राहकांना स्टेट बँकेमार्फत व्यापारी, नोकरदार तसेच विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. बँकिंग सेवा अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ग्राहकांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ग्राहक संमेलनादरम्यान उपस्थित ग्राहकांनी बँकिंग व्यवहारांशी संबंधित विविध अडचणी आणि समस्या मांडल्या. यावर बँकेचे अधिकारी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बँक प्रयत्नशील असून, प्रत्येक समस्येवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी शाखा व्यवस्थापक अंकुश रोडे आणि नागेश टेकाळे यांनी ग्राहकांना बँकेच्या सेवा, कर्ज योजना, डिजिटल सुविधा आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. तसेच, अनेक ग्राहकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
संमेलनास बँकेचे ग्राहक, व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील दोन्ही शाखांमध्ये ग्राहकांना समाधानकारक सेवा आणि सुविधा उपलब्ध होत असल्याचे मत अनेक ग्राहकांनी व्यक्त केले.
या ग्राहक संमेलनाच्या माध्यमातून बँक प्रशासनाने ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासह डिजिटल बँकिंग व्यवहारांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

