Buddhist Mahasabha honors : अकोला जिल्ह्यात बौद्ध समाजामध्ये विवाह सोहळे वेळेत पार पडावेत यासाठी शिस्तीचा नवा पायंडा पडताना दिसत आहे. विवाह वेळेत न लावणाऱ्यांवर दंडात्मक भूमिका घेण्याचा निर्णय भारतीय बौद्ध महासभेकडून राबविण्यात येत असताना, पातूर तालुक्यातील बेलुरा बू. येथील एका विवाह सोहळ्याने वेळेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वेळेवर विवाह पार पाडल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेकडून नवदांपत्यासह दोन्ही कुटुंबांचा जाहीर सन्मान करण्यात आला.

‘वेळ पाळा, समाज घडवा’; बेलुरा येथे वेळेत पार पडलेल्या विवाहाचे कौतुक
राहुल सोनोने
दिग्रस बू.: अकोला जिल्ह्यात बौद्ध समाजामध्ये विवाह सोहळे वेळेत पार पडावेत यासाठी शिस्तीचा नवा पायंडा पडताना दिसत आहे. विवाह वेळेत न लावणाऱ्यांवर दंडात्मक भूमिका घेण्याचा निर्णय भारतीय बौद्ध महासभेकडून राबविण्यात येत असताना, पातूर तालुक्यातील बेलुरा बू. येथील एका विवाह सोहळ्याने वेळेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वेळेवर विवाह पार पाडल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेकडून नवदांपत्यासह दोन्ही कुटुंबांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
बेलुरा बू. येथील प्रेमानंद इंगळे यांनी आपल्या मुलीचा विवाह निश्चित वेळेतच पार पाडण्याचा निर्धार केला होता. विवाहपूर्व बैठकीतच सोहळ्याची वेळ जाहीर करण्यात आली होती आणि “वेळेवरच विवाह होईल” असा स्पष्ट संदेश देण्यात आला होता. त्यानुसार उपासिका नेहा प्रेमानंद इंगळे आणि उपासक अभिलेश विनायक खंडारे यांनी वेळेचे महत्त्व जपत ठरलेल्या वेळी विवाहस्थळी उपस्थिती लावली.
पारंपरिक विलंब, डीजे व अनावश्यक विधींना फाटा देत सकाळी ११.२५ वाजता विवाह सोहळा वेळेत पार पडला. उपासक-उपासिकांनी वेळेचे काटेकोर पालन केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेकडून मंगल परिणय मंचावरच नवदांपत्य तसेच दोन्ही कुटुंबीयांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे बौद्ध समाजासह इतर समाजघटकांकडूनही कौतुक होत आहे.
लग्न समारंभांमध्ये वाढत्या विलंबामुळे नागरिकांना, विशेषतः महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना उन्हातान्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर बुद्ध विहार समन्वय महासंघाच्या पुढाकारातून धमाबोधी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली “बौद्ध परिणय नियमन समिती” स्थापन करण्यात आली असून, विवाह वेळेत पार पडावेत यासाठी जनजागृती अभियान सुरू आहे.या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विवाह सोहळ्यांच्या वेळेच्या नोंदी ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बेलुरा बू. येथील विवाह हा त्याच मोहिमेचा भाग मानला जात असून, समाजात वेळेचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, “वेळ पाळली तरच समाजात शिस्त निर्माण होईल” असा संदेश देत इतरांनीही वेळेवर विवाह लावण्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन बौद्ध महासभेचे महासचिव नंदकुमार डोंगरे यांनी केले.

