Three individuals who launched : गावातील रेणुका नगरात एक युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून पळून गेलेल्या तीन संशयीत युवकांना बोरगाव मंजू पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत शस्त्रासह गजाआड केले.या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोरगाव मंजू पोलिसांची धडक कारवाई ; न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी
अकोला : गावातील रेणुका नगरात एक युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून पळून गेलेल्या तीन संशयीत युवकांना बोरगाव मंजू पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत शस्त्रासह गजाआड केले.या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव मंजू येथील पंकज अघडते या युवकावर त्याच्याच घरात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर पंकज अघडते हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, प्राथमिक तपासात हल्ला करणारे तिघेजण असल्याचे निष्पन्न झाले. संशयित घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल गोपाळ यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, रविंद्र धुळे, ज्ञानेश्वर लांडे तसेच हेड कॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, सुदीप राऊत, सचिन सोनटक्के,शेखर कोद्रे, नारायण शिंदे, महादेव पातोंड, अक्षय देशमुख आदींचे विशेष पथक तयार केले.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित ओम वाघमारे, रितेश यादव हे दोघे बोरगाव मंजू परिसरातुन दोघांना ताब्यात घेतले तर एक शाम ठाकरे हा काटेपुर्णा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शाम ठाकरे याला काटेपुर्णा परिसरातून ताब्यात घेतले. तपासादरम्यान हल्ल्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र रस्त्याच्या कडेला लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी ते शस्त्र जप्त करत अवघ्या दोन तासांत तिन्ही संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. १७ मे रोजी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले असले, या गंभीर घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे,पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे पोलिस कर्मचारी आकाश जंजाळ पुढील तपास करीत आहेत.

