Warn of Election Boycott : बाळापूर तालुक्यातील चिंचोली गणू गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गम बल्हाडी गावातील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थ आक्रमक
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील चिंचोली गणू गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गम बल्हाडी गावातील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
अंदाजे ७०० लोकसंख्या असलेल्या बल्हाडी गावात प्रामुख्याने नाथ जोगी समाजातील नागरिकांचे वास्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत गावात वीजपुरवठा वगळता शासनाकडून कोणतीही ठोस भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावात केवळ एक हातपंप असून त्यावरच ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जाते. रस्ते, आरोग्य सुविधा, संरक्षण भिंत, नियमित पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या वतीने मंत्रालय तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी निवेदने, पत्रव्यवहार आणि मागण्या करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
बल्हाडी गावात तातडीने रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा आणि संरक्षण भिंत यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एका महिन्याच्या आत कामांना सुरुवात न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
कायदो व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

