Heatstroke Ward Missing : तालुक्यात तापमानाचा पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला असताना ग्रामीण भागातील नागरिक उष्माघाताच्या धोक्याशी झुंज देत आहेत. मात्र दुसरीकडे देऊळगाव राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये उष्माघात कक्षच कार्यान्वित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा; लाखोंचा खर्च, पण रुग्ण मात्र वाऱ्यावर
गजानन तिडके / ऑन द स्पॉट
देऊळगाव राजा : तालुक्यात तापमानाचा पारा ४४ अंशांपर्यंत पोहोचला असताना ग्रामीण भागातील नागरिक उष्माघाताच्या धोक्याशी झुंज देत आहेत. मात्र दुसरीकडे देऊळगाव राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये उष्माघात कक्षच कार्यान्वित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने १ एप्रिल २०२५ पासून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही स्थानिक आरोग्य प्रशासनाने त्याकडे अक्षरशः कानाडोळा केल्याचे दिसून आले.
याहून गंभीर बाब म्हणजे या आरोग्य केंद्रांवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारावर शासन दरमहा लाखो रुपये खर्च करत असताना प्रत्यक्षात रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने शासनाचा पैसा अक्षरशः पाण्यात जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
रुग्णालयात सुविधा नाहीत, खासगी दवाखान्यांकडे ढकलले जाते रुग्ण
सर्वसामान्य व गरीब नागरिकांना मोफत उपचार मिळावेत म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे उभारली. कोट्यवधी रुपयांची आधुनिक यंत्रसामग्री, औषधसाठा आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले. मात्र प्रत्यक्षात अनेक रुग्णांना किरकोळ आजारासाठीही खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल २९ गावे येतात. या भागासाठी आठ आरोग्य सेविका, नऊ आरोग्य सेवक तसेच विविध उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त आहेत. तरीही आरोग्य सेवा कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
“उष्माघात कक्ष म्हणजे काय?” कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही!
१२ मे रोजी सकाळच्या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता उपस्थित कर्मचाऱ्यांना “उष्माघात कक्ष म्हणजे काय?” याचीच माहिती नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. त्यामुळे उष्माघाताची लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याचे स्पष्ट झाले.
ग्रामस्थांच्या मते, शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा औषधसाठा उपलब्ध असूनही रुग्णांना कोणताही आजार असो, दोन-तीन गोळ्या देऊन बोळवण केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील उपकेंद्रे केवळ नावालाच सुरू आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सहा उपकेंद्रांचीही तीच अवस्था
जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोराखेडी बावरा, असोला जहांगीर, गिरोली खुर्द, भिवगाव बुद्रुक, सावखेड भोई, सिनगाव जहांगीर आणि मेहुना राजा या उपकेंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त असले तरी अनेक ठिकाणी कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे.विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रशासनाची नेहमीचीच सबब
तालुका आरोग्य अधिकारी एस. आर. बनसोड यांनी “जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेची अडचण असल्याने उष्माघात कक्ष सुरू करता आलेला नाही. लवकरच जागा उपलब्ध करून कक्ष सुरू करण्यात येईल,” असे स्पष्टीकरण दिले.
तर सिनगाव जहांगीर येथील ग्रामस्थ संतोष बंगाळे यांनी, “उपकेंद्रातील कर्मचारी नियमित उपस्थित राहत नाहीत. उष्माघात कक्ष तातडीने सुरू करून ग्रामीण रुग्णांना सुविधा द्याव्यात,” अशी मागणी केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

