Dongaon Zilla Parishad circle : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले असून, त्यामध्ये डोणगाव जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण तर डोणगाव पंचायत समिती सर्कलदेखील सर्वसाधारण श्रेणीत निघाले आहे. याशिवाय, शेलगाव देशमुख पंचायत समिती सर्कल ओबीसी महिला या श्रेणीत सुटल्याने डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावेळी तुल्यबळ लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

डोणगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले असून, त्यामध्ये डोणगाव जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण तर डोणगाव पंचायत समिती सर्कलदेखील सर्वसाधारण श्रेणीत निघाले आहे. याशिवाय, शेलगाव देशमुख पंचायत समिती सर्कल ओबीसी महिला या श्रेणीत सुटल्याने डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावेळी तुल्यबळ लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
डोणगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी इच्छूक उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, शिवसेनेचे माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, कॉंग्रेसचे विनायकराव टाले, तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांचा समावेश आहे. याशिवाय, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलूभाई ठेकेदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव हे देखील इच्छूकांच्या यादीत आहेत. तर पंचायत समिती डोणगावसाठी शिंदे गटातील शिवसेनेचे सूरज दिनोरे, माजी सरपंच जुबेर खान, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जावेद खान ठेकेदार आदी इच्छूकांनी तयारी सुरू केली आहे.
याआधी कॉंग्रेसचे शैलेश सावजी आणि राजेंद्र पळसकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविल्याने त्यांचा मतदारांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणी पुन्हा आपले नशीब आजमावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नवीन इच्छूकही मैदानात उतरणार असून, यावेळी डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये नव्याने काही गावे समाविष्ट झाल्याने निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.सदर सर्कलमध्ये डोणगाव, शेलगाव देशमुख, गोहोगाव, पांगरखेड, विठ्ठलवाडी, बेलगाव ही नवी गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या गावांतील मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराकडे झुकतो, यावर निकाल ठरणार आहे.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. घरोघरी जाऊन शुभेच्छा व भेटवस्तू देत मतदारांचा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून, मतदारांमध्येही “या दिवाळीत इच्छूक कामाला लागले” अशी चर्चा रंगली आहे.

